बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.
राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्यांवर आंदोलन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
केंद्राची शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका – सतेज पाटील
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेतली असल्याची टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांन केली. त्यांनी प्रवर्गाची तरतूद केली आहे. मागच्या दाराने लोकांचा डेटा गोळा करणे सूरू आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा डेटा निवडणुकीत वापरण्यासाठी असा प्रकार तर सूरू नाही ना अशी शंका मनात येत आहे.
फडणवीसांनी काल मांडला अर्थसंकल्प
पंचामृत ध्येयावर आधारित एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास आणि राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशा घोषणांची आतिषबाजी केली. महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. हे पाहता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा षटकार ठोकला आहे.
अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा!, विरोधकांची टीका
काल सादर झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकलपवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरले..फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर हलवा’, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प असून हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.
राज्यातील कांदा प्रश्न आणि अवकाळी पावसावरुन विरोधक आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण उत्पादक शेतकरी संकटात आहे. 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वाया गेली आहेत. त्यांनातत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.