खरोळा फाटा ते पानगाव रस्ता केव्हा पूर्ण करणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार धिरज देशमुख यांनी वेधले सरकारचे लक्ष
लातूर : खरोळा फाटा ते पानगाव या रस्त्याचे काम रखडले असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न केव्हा मार्गी लावणार, असा प्रश्न ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी उपस्थित केला.
मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी तारांकित प्रश्न मांडत खरोळा फाटा ते पानगाव या रस्त्याच्या रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. खरोळा फाटा ते पानगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र. 361H) दुरुस्तीचा प्रस्ताव अनेकवेळा शासनास पाठवूनही त्याला अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. रस्त्याचे काम न झाल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असून यात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा रास्ता रोको आंदोलनही केले आहेत. खरोळा फाटा ते पानगाव रस्त्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, यावर आमदार श्री. धिरज देशमुख यांनी भर दिला.
या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूर – रेणापूर रा. म. क्र. 548 बी व रेणापूर ते पानगाव रा. म. क्र. 361 एच या कामातील खरोळा फाटा ते पानगाव या 14.2 किलोमिटर रस्त्याचे नवीन अंदाजपत्रक (किंमत 82.89 कोटी) केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे प्रादेशिक अधिकारी, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. सदरील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा स्वीकृती प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यात येईल.