नवी दिल्ली : नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (NDPP) पक्षाचे नेते नेफ्यू रिओ यांनी पाचव्यांदा नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून आज (ता. ७ मार्च) शपथ घेतली. त्यांच्या या मंत्रिमंडळात प्रथमच महिलेला संधी मिळाली आहे. नागालॅंड विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या सलहौतुओनुओ क्रूस यांना राज्यातील पहिल्या मंत्री बनण्याचाही मानही मिळाली आहे
नागालॅंडमध्ये विरोधी पक्षविरहित विधानसभा असणार आहे. कारण, सर्वपक्षीयांनी सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्री रिओ, उपमुख्यमंत्री म्हणून झेलियांग आणि पॅटन यांनी शपथ घेतली. याव्यतिरिक्त नऊ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या सर्वांचे मोदी, शहा यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री रिओ यांच्या व्यतिरिक्त, तादितुई रंगकाऊ झेलियांग आणि यानथुंगो पॅटन यांनी नागालँडचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच, मुख्यमंत्री रिओ यांच्या सरकारमध्ये अन्य नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यापैकी जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पायवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, टेम्जेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, पी बाशांगमोंगबा चांग आणि नागालँडच्या पहिल्या महिला आमदारांपैकी एक असलेल्या सलहौतुओनुओ क्रूस यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सलहौतुओनुओ क्रूस या प्रथमच विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यांनी पश्चिम अंगामी या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवाराचा अवघ्या सात मतांनी पराभव केला आहे. त्यांना रिओ यांच्या मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली आहे.
दरम्यान, नागालॅंड मंत्रिमंडळात संधी मिळाल्याबद्दल सलहौतुओनुओ क्रूस यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, नागालॅंडमध्ये पहिला महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. महिला कठोर परिश्रम आणि प्रामाणिक असल्यास सर्व कामे देखील करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.