• Wed. Apr 30th, 2025

सामनातून भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल:कसब्याचा निकाल लोकशाहीचे हत्याकांड घडवणाऱ्या गद्दारांच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचा

Byjantaadmin

Mar 3, 2023

कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही. तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे, हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले, असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप व शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनात म्हटले आहे की, एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले. आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे. कसव्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे. कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही 2024 पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील!!

ऐका विभिन्न शैलीच्या पॉडकास्ट

सामनात म्हटले आहे की, पुण्यातील कसबा हा तब्बल 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला गड महाविकास आघाडीने उदध्वस्त केला आहे. कसबा आणि चिंचवड या पुण्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने याचा दारुण पराभव केला, तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी या केवळ तिरंगी लढतीमुळे विजयी झाल्या. तिथेही कसव्याप्रमाणेच दुरंगी लढत झाली असती तर ‘खोकेशाही’च्या नादाला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातच काय, देशातही तोंड दाखवायला जागा राहिली नसती.

ओरिजनल शिवसेनेचे योगदान

सामनात म्हटले आहे की, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, ते कसब्याच्या निकालाकडे. कारण 1995 पासून ते आजतागायत सलग 28 वर्षे या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते. आधी गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळक येथून निवडून गेल्या. अर्थात, भाजपच्या आजवरच्या कसब्यातील विजयामध्ये त्या वेळी युतीमध्ये असलेल्या ‘ओरिजनल शिवसेनेचे योगदानही तेवढेच महत्वपूर्ण होते. शिवसैनिकांनी त्या वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती, तर भाजपचा हा कपोलकल्पित गड कधीच धराशायी पडला असता.

भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा

सामनात म्हटले आहे की, कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा “भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तथाकथित महाशक्तीला पराभूत करण्याचा उत्तम वस्तुपाठ कसब्याच्या निकालाने घालून दिला आहे.

विजयाची ठिणगी

सामनात म्हटले आहे, राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली, त्या गद्दारीचे मुस्काट फोडणारे परिवर्तन कसब्याने घडवले.

आधी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मशाल पेटली, त्यापाठोपाठ शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका व आता कसब्यामध्ये पडलेली विजयाची ही ठिणगी भविष्यात महाराष्ट्र व देशातही परिवर्तनाचा वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. कसब्याचा निकाल म्हणजे लोकशाहीचे हत्याकांड घडवून गद्दारांच्या खोकेशाहीला राजवस्त्रे देणाऱ्या हुकूमशहा व ठोकशहाच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed