सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे 8 मार्च रोजी मुलाखतींचे आयोजन
- ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन
लातूर, दि. 01 (जिमाका) : नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 8 मार्च 2023 रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.
लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘जागेवरच निवड संधी’ मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या नोकरभरतीची गरज असलेल्या उमेदवारांना थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.
या मेळाव्यामध्ये लातूर मधील क्रेडीट एक्सेस ग्रामीण लि.मध्ये फिल्ड ऑफिसरच्या 30 जागांसाठी भरण्यात येणार असून इयत्ता बारावी आणि पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. तसेच डी. के. इन्फोटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर टीचिंग पदांच्या पाच जागा भरण्यात येणार असून त्यासाठी पदवीधर, पदव्युत्तर पदवी, संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार पात्र आहेत.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार, 08 मार्च 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयासमोर, लातूर, येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा बायोडाटा, रिझ्युम, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.