तानाजी सावंत आणि संभाजीराजे छत्रपतीधाराशिव: राज्याच्या आरोग्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यापासून तानाजी सावंत हे कायमच वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मध्यंतरी त्यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्यांची मालिका लावली होती. यानंतर वरिष्ठांकडून योग्य ती समज देण्यात आल्यानंतर तानाजी सावंत हे ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ या उक्तीनुसार वागताना दिसत आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे प्रमाणही कमी केले आहे. यानंतरच्या काळात कोणताही वाद न ओढावून घेतल्यामुळे तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्याचा कारभार आलबेल सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आरोग्य सुविधेची वानवा आणि रुग्णालयांची दुरावस्था झाल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. त्यामुळे तानाजी सावंत कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.