मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ४० आमदारांना आपण सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात या ४० आमदारांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लक्ष्य केले. एवढेच नव्हे तर शिंदे गटातीलच काही लोक अधिवेशनाच्या काळात आपल्याला गुप्तपणे मदत करत असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. उद्या जेव्हा अधिवेशन सुरू होईल, तेव्हा त्यांचीच (शिंदे गट) आणि मित्र पक्षातले (BJP) लोक आपल्याकडे येतात आणि घोटाळ्याचे कागद देतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत बोलत होते.
या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघाती टीका केली. गद्दार लोकांनी नाव चोरलं, चिन्हं चोरलं. पण या खुर्च्या चोरू शकत नाही. अलीबाबा आणि ४० चोरांचे हे सरकार अल्पायुषी आहे. या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, त्यापूर्वीच हे सरकार कोसळेल. शिवसेना पक्ष फोडणाऱ्या ४० आमदारांना, आपण नवे सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात त्यांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे. केवळ शिवसेना पक्ष फोडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटल
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. वरळीतून माझं डिपॉझिट जप्त होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे. मी तुमच्या कोपरी-पाचपाखाडी परिसरात येऊन निवडणूक लढवेन. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://jantaexpress.co.in/?p=4323