निलंगा:-निलंगा औसा रोड वरील जाऊ पाटी जवळील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे जळून भस्मसात झाले आहे. या आगीत अंदाजे 50 ते 60 लाखाचे नुकसान झाले आहे.
निलंगा येथील शंकर विश्वनाथ भुरके यांचे संतोष इंटरप्राईजेस नावाचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान असून निलंगा औसा रोड वर जाऊ पाटी जवळ त्यांचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे व खुर्च्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आग लागली. या आगीने गोडाऊन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू प्लास्टिकच्या खुर्च्या गाद्या यांनी पेट घेतल्याने दुकानातील एलईड टि.व्ही., फ्रिज, सोफासेट, कुलर, खुर्च्या कपाट, डायनिंग टेबल, गाद्या, वाशिंग मशीन, आदी सुमारे 50 ते 60 लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे. साडेअकराच्या सुमारास गोडाऊन मधील साहित्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आगीचे व धुराचे लोट निघाल्यानंतर रोडवरील जाणारे येणाऱ्या व्यक्तीने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना फोन करून याची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष शिंगाडे यांनी दुकान व गोडाऊन चे मालक शंकर भुरके यांना फोनवरून आग लागली असल्याचे निरोप दिले व तातडीने निलंगा नगरपालिकेच्या अग्निशमनदलास व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन व आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. शॉर्टसर्किटमुळे गोडाऊनला आग लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित लोकांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळळे,महेश धुमाळ, शैलेश वजीर, सतीश सूर्यवंशी, प्रकाश पटणे, नवनाथ कुडुंबले, राजकुमार चिक्राळे, राजू निला, संतोष सोरडे सौरभ नाईक, मारुती नागदे, नागनाथ सोरडे, आदींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गोडाऊन मधील सर्व साहित्य जळून गेले व यात गोडावून मधील प्लास्टिक खुर्च्या मोठ्या प्रमाणात पगळून गेल्या आहेत. अग्निशमन दलाचे गंगाधर खरोडे, नागेश तुरे, श्रीकांत कांबळे, मादळे यांच्यासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली. किल्लारी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.
निलंगा येथील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन जळून खाक
