रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनासाठी निघालेले काँग्रेस नेते पवन खेरा यांना गुरुवारी दिल्लीत विमानातून उतरवण्यात आले. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेल्या इतर काँग्रेस नेतेही भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले.
इंडिगोच्या विमानात उपस्थित असलेले प्रवासी रंजित कुमार यांनी दिव्य मराठीला घटनेची माहिती दिली. विमानातील अधिकाऱ्यांनी खेरा यांना नेल्याचे त्यांनी सांगितले. खेरा यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते प्रवास करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या अधिवेशनाला हुकूमशहा घाबरले- काँग्रेस
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, पवन खेरा यांच्यावर कोणत्या कलमाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ते सामान्य नागरिकासारखे का विमान प्रवास का करू शकत नाहीत. आमच्या अधिवेशनावर भाजप नाराज आहे. आधी ईडी पाठवता आणि आता हे. तुमचे काही चुकले असेल तर का लपवत आहात, कारवाई करा. कारण फक्त हुकूमशहा चिडलेला आहे. जोपर्यंत पवन खेरा येत नाहीत, तोपर्यंत आम्ही विमान उड्डाण होऊ देणार नाही.
छत्तीसगडमध्ये अधिवेशनापूर्वी ईडीने काँग्रेस नेत्यांवर छापे टाकले
छत्तीसगडमध्ये 20 फेब्रुवारीला सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या 6 नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. यात आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी होते. एजन्सीने कोळसा लेव्ही घोटाळ्यात कारवाई केली होती. रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनाच्या 4 दिवस आधी हा छापा टाकण्यात आला होता. ही कारवाई अधिवेशनात व्यत्यय आणण्यासाठी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या कारवाईवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, “गेल्या 9 वर्षांत ईडीने टाकलेल्या छाप्यांपैकी 95% छापे विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात आहेत आणि बहुतेक काँग्रेस नेत्यांच्या विरोधात आहेत.
माझे सामान तपासण्यासाठी उतरवले – दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर खेरा
दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारला असता खेरा म्हणाले, ‘दिल्ली पोलिस अधिकारी माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुमचे सामान तपासायचे आहे. मी म्हटले की कोणतेही सामान नाही. तरीही ते म्हणाले, आमच्यासोबत चला, आता डीसीपी तुमच्याशी बोलतील. मी वाट पाहत राहिलो, डीसीपी आले नाहीत. नियम आणि कायदे काय आहेत हे मला माहीत नाही. मी तर त्यांची वाट पाहत आहे.”
आसाम आणि यूपी पोलिसांत गुन्हा दाखल, आसाम पोलिस अटक करणार
आसाम पोलिसांचे प्रवक्ते सुशांत भुयान यांनी दिव्य मराठीला सांगितले की, बुधवारी रात्री पवन खेरा यांच्याविरुद्ध जातीय तेढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एक वक्तव्य केले होते, त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता दिल्ली विमानतळावर सीआयएसएफ तैनात करण्यात आले आहे. आसाम पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली पोलिस खेरा यांना अटक करणार असल्याचे सूत्रांनी ANI ला सांगितले.