लातूर जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींच्या
पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
- 24 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध
- 2 मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार
- 9 मार्चला प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
लातूर, दि. 22, (जिमाका): निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या 20 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी 5 जानेवारी 2023 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध होईल. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी 9 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी कळविले आहे.