2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मल्लिकार्जुन खरगे मंगळवारी नागालँडमध्ये एका सभेला संबोधित करत होते. 100 मोदी आणि 100 शहा आले तरी सरकार काँग्रेसचेच बनणार असल्याचे ते म्हणाले.
खरगे म्हणाले की, ‘2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक भाजपला हटवतील. आम्ही इतर पक्षांशीही याबाबत बोलत आहोत, अन्यथा देशातील लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहासारखे वागत असल्याचेही खरगे म्हणाले.
मोदी-भाजपबद्दल खरगे यांनी मांडलेले चार महत्तचे मुद्दे
1. जनतेने मोदींना निवडून दिले, 2024 मध्ये तेच धडा शिकवतील
खरगे म्हणाले, ‘मोदी अनेकदा म्हणतात की, देशाला तोंड देणारी एकमेव व्यक्ती आहे. त्यांना या देशातील अन्य कोणीही स्पर्श करू शकत नाही. असे कोणीही लोकशाहीवादी म्हणू शकत नाही. तुम्ही लोकशाहीत आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही हुकूमशहा नाही. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले तेच तुम्हाला 2024 मध्ये धडा शिकवतील.
2. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ
ते म्हणाले की, ‘केंद्रात आघाडीचे सरकार येणार आणि काँग्रेस त्याचे नेतृत्त्व करेल. आम्ही इतर पक्षांशी बोलत आहोत. आम्ही लोकांशी बोलत असतो, त्यांच्याशी आमच्या कल्पना शेअर करत असतो. आम्ही 2024 च्या निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल बोलत आहोत. आता भाजप बहुमतात येणार नाही. इतर पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवू. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ.
3. काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले, भाजपने नाही
खरगे म्हणाले की, ‘100 मोदी आणि ‘100 शहा येऊ द्या, हा हिंदुस्थान आहे. आमच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले आहेत. काँग्रेसवाल्यांनी जीव दिला. भाजपच्या लोकांनी दिलेला नाही. मला भाजपचा असा एक माणूस जो स्वातंत्र्यासाठी लढला, तुरुंगात गेला.’
4. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गांधींची त्यांनी हत्या केली
ते म्हणाले की, ‘जो माणूस स्वातंत्र्यासाठी लढत होता…ते महात्मा गांधी…. त्यांना या लोकांनी मारले. असे लोक देशभक्तीच्या गप्पा मारत असतात. ज्यांनी जीव घेततला तेच आम्हाला शिकवत आहेत. इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण दिले. ज्यांनी भाजपमध्ये कोणी आपला जीव दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 2014 मध्येच स्वातंत्र्य मिळाले असे त्यांना वाटते, त्यांना 1947 आठवत नाही, असेही ते म्हणाले.
रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संबंध आणि पक्षातील कलह यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. काँग्रेसमधील सदस्यत्व फी वाढवली जाऊ शकते आणि काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) च्या सदस्यांसाठीही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.
प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून घ्या, बदल
सभासद शुल्क किती वाढवता येईल?
सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात येत आहे की, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्यत्व शुल्क 1000 रुपये केले जाऊ शकते. ते सध्या 100 रुपये आहे. वाढीव फीमध्ये 400 रुपये विकास शुल्क आणि 300 रुपये पक्ष मासिक संदेशसाठी असतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्यत्व फी 3000 असू शकते. 5 वर्षांसाठी सदस्याला 1000 रुपये विकास शुल्क भरावे लागतील.
मेंबरशिप फी वाढवण्याचे कारण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फी वाढीमुळे कार्यकर्त्यांवर पक्षाची जबाबदारी अधिक राहील, असे पक्ष नेतृत्वाचे मत आहे. काँग्रेस निधीच्या समस्येने ग्रासली आहे, अशा वेळी फी वाढवल्यास त्यालाही मदत होईल.
CWC निवडणूक झाल्यास काय प्रक्रिया असेल, राहुल-प्रियांका यांच्यावर काही परिणाम होईल का?
CWC सदस्यांची निवड प्रस्तावित करण्याची तयारी सुरू आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाचे नेते, संसदीय पक्षाचे अध्यक्ष थेट CWC चे सदस्य निवडले जातील. राहुल अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या सदस्यत्वाबाबत शंका नाही, मात्र प्रियांकाला निवडणूक लढवावी लागणार आहे. जर निवडणुका झाल्या तर प्रियांकाला बहुमत मिळेल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
सदस्यत्व आणि CWC व्यतिरिक्त, आणखी काही बदल विचारात घेतले जात आहेत का?
होय, पक्षात एससी, एसटी आणि ओबीसींना 50 टक्के कोटा देण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय 50 वर्षांखालील तरुण चेहऱ्यांना प्रोत्साहन देण्यावरही काँग्रेसचा भर आहे.
या बदलांचे कारण काय?
यावर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणूक आहे. पक्षाला आतापासूनच आवश्यक ते बदल करायचे आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर या बदलांचा विचार केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेनंतर राहुल गांधींचे लक्ष या नेत्यांनी ग्राउंडवरील कार्यकर्त्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडायला हवे, याकडे आहे. नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक भर द्यावा, याकडेही लक्ष देण्यात येत आहे.