• Sat. May 10th, 2025

बोगस रॅकेटशी आपला सबंध नाही; मंत्रालयातील बोगस भरती प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Byjantaadmin

Feb 15, 2023
माजी मंत्री धनंजय मुंडे  यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात एका मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणातील आरोपी यांचा माझ्या कार्यालयाशी कसलाही संबंध नसून, बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आली असून, यापैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार…

दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात शिपाई असल्याचे भासवत या तरुणांनी एकाला नोकरी लावून देतो, असे सांगत फसवणूक केली आहे. या बोगस नोकर भरती प्रकरणी देण्यात आलेले पत्र देखील बनावट आहे, त्यावर असलेले सह्या आणि शिक्के देखील बनावट असून, नोकरी शोधत असलेल्या लोकांनी अशा भामट्यांपासून सावध राहायला हवे, असेही मुंडे यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

काय आहे प्रकरण?

धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून, एका आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत होता. या प्रकरणी पालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत लक्ष्मण कदम (67) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि दोन मुलांसोबत लक्ष्मण कदम हे गोवंडी परिसरात राहतात. दरम्यान, त्यांच्या मुलाचे एम.एस.सी. झाले असून, त्याच्यासाठी ते नोकरी शोधत होते. दरम्यान याच काळात त्यांचा लहान मुलगा रत्नजीत कदम यांने व्हॉट्स ॲपवर सरकारी नोकरी संदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजारांची तर कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी साडेसात लाख रुपयांची मागणी केली. पत्नीचे दागिने गहाण ठेवून कदम यांनी माळवेला 7 लाख 30 हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांना एक बनावट नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. त्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार, कदम यांचा मुलगा मंत्रालयात गेला, असता त्याला आज,उद्या करत चालढकल करण्यात आली. त्यामुळे आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *