लातूर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त व शहिद जवानांच्या कुटुंबातील मुला – मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा-आमदार अभिमन्यू पवार यांची घोषणा
लातूर जिल्ह्य़ातील शहीद जवान व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचा विवाह सोहळ्याचे आयोजन – आ.अभिमन्यू पवारांचा पुढाकार
औसा – आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांच्या कुटुंबातील मुला – मुलींचे विवाह लावून मुलींचे कन्यादान करणार असल्याची घोषणा केली होती.यामध्ये लातूर जिल्ह्य़ातील विविध भागातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीवरून या विविह सोहळ्याला व्यापक स्वरूप देण्यात आले असून आता संपुर्ण लातूर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांच्या कुटुंबातील मुला-मुलींसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असून संबंधित कुटुंबातील विवाह जुळवून याची माहिती संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना देण्यात यावी अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
१० मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत औसा येथील उटगे मैदानावर या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांच्या कुटुंबातील मुला – मुलींसाठी मर्यादित असलेल्या हा विविह सोहळा आता संपूर्ण लातूर जिल्ह्य़ातील संबधित कुटुंबातील मुला – मुलींसाठी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील नैसर्गिक आपत्ती, नापीक व कर्जबाजारीपणा आशा विविध कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला – मुलींसाठी तसेच देशसेवा बजावत असताना देशासाठी शहिद जवानांच्या कुटुंबासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विविह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात मुलींना संसार उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या विवाह सोहळ्यातच आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार यांचाही विवाह पार पडणार आहे. तरी लातूर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहिद जवानांच्या कुटुंबातील मुला – मुलींचे विवाह जुळवून याची माहिती संबंधित तहसीलदार यांना देण्याचे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.