अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी दुपारी थोरात संगमनेरला परतत आहेत. येथे त्यांचे भव्य स्वागत होईल. त्यांचे हे ‘कमबॅक’ होत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच. मात्र, ज्यांच्यामुळे हे घडले ते आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी काय निर्णय होणार? या वादात ज्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, त्यांची काय भूमिका असणार आणि मुख्य म्हणजे थोरात यांचा हा निर्णय पक्का राहील का? याकडे आता लक्ष लागलं आहे.
हिवाळी अधिवेशासाठी नागपूरला गेले असता तेथे घसरून पडल्याने थोरात जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. ते रुग्णालयात असतानाच नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. त्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. याची जबाबदारी थोरात यांच्यावर टाकून ते भाजपमध्ये जाणार असल्याचे आरोपही झाले. यातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांचे उघड मतभेद झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईत होत असलेल्या बैठकीकडे लक्ष लागले होते. थोरात आजारी असल्याने बैठकीसाठी आलेले महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनीच स्वत: थोरात यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तेथे यासंबंधी चर्चा झाली. त्यानंतर थोरात यांची नाराजी दूर झाल्याचे व त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. एवढेच नाही तर त्यांना पक्षाच्या रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठीही निमंत्रित केल्याचे आणि थोरातांनीही ते मान्य केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.
या पार्श्वभूमीवर थोरात सोमवारी संगमनेरला येत आहेत. मधल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले, संशय घेतले गेले. भाजपमध्ये तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रणही दिले गेले. यावर थोरात अधूनमधून व्यक्त होत असले तरी संपूर्ण भूमिका त्यांनी मांडली नव्हती. ती आता मांडली जाईल अशी शक्यता आहे. यामध्ये ते तांबे यांच्यासंबंधी काय बोलणार, त्यांचे काँग्रेसमध्ये थांबण्याचे ठरले असेल तर तांबे काय निर्णय घेणार, थोरात यांचा हा निर्णय पक्षाने कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यांना मान्य असेल का? त्यांनाही पुन्हा सन्मानाने पक्षात घेतलं जाईल का? याची उत्तरे लवकरच मिळतील. कदाचित रायपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.
थोरात यांच्याबाबतीतील हा निर्णय प्रदेशाध्यक्ष पटोले यांना शह देणाराच आहे. थोरात परत आलेच तर पटोले यांनी कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा सन्मानाने पक्षात घ्यावे लागणार आहे. नाशिक पदवीधरमध्ये आतापर्यंत थोरात यांना व्हिलन ठरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता थोरात यांनी एकाच वेळी भाजप आणि पक्षातील विरोधक यांना मात देत भाचा सत्यजीत याला कसे निवडून आणले, हे सांगून त्यांना हिरो करण्याचाही प्रयत्न होऊ शकेल. थोरात यांचे कमबॅक कायम राहिले, त्यांच्यासोबत तांबेही काँग्रेससोबत राहिले तर हा भाजप आणि थोरातांचे पक्षातील विरोधक यांनाही शह ठरणार आहे. अर्थात दुखावलेले पदाधिकारी थोरातांना कशी साथ देणार? यावर पुढील चित्र अवलंबून आहे.