• Wed. May 7th, 2025

आता ‘त्या’ गुरुजींची काही खैर नाही; थेट विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले आदेश

Byjantaadmin

Feb 12, 2023

जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळावं म्हणून बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या घटनेची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या धर्तीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्हा परिषद यांना पत्र पाठवण्यात आले आहे. ज्यात संवर्ग 1 मधून बदली वा सूट मिळविलेल्या गुरुजींची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्ग 1 मधून बदली झालेले तसेच सूट मिळविलेल्या गुरुजींची स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एवढेच नाही तर प्रमाणपत्रांची पडताळणीही करण्यात आली. यातून बनवेगिरी केलेले तब्बल 70 हून अधिक गुरुजी समोर आले आहेत. यानंतर त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. एवढेच नाही तर विभागीय चौकशीही प्रस्तावित केली आहे. दरम्यान बीडच्या धर्तीवर संवर्ग 1 मधील शिक्षकांची (बदली झालेले व सूट घेतलेले) वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी करावी, असे आदेश

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने काढले आहेत. संबंधित कार्यवाहीअंती जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही नमूद केले आहे.

काय म्हटले आहे आदेशात?

  • औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हा परिषदामधील प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यात विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची व संबंधित शिक्षकांची विभागीय आयुक्त कार्यालयाने विशेष समिती नेमून तपासणी-पडताळणी करावी.
  • विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून पात्र शिक्षकांना न्याय द्यावा.
  • शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असलेल्या शिक्षकांना परभणी जिल्हा परिषदेमध्ये कायदेशीरपणे आंतरजिल्हा बदल्या दिल्या आहेत सदर प्रकरणाचीही चौकशी व्हावी.
  • केवळ दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची चौकशी न होता, विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 या संवर्गाचा लाभ घेतलेल्या सर्व शिक्षकांची या विशेष समितीकडून फेर तपासणी व्हावीव दोषी शिक्षकावर कडक कारवाई करावी.
  • जिल्हा अंतर्गत बदलीसाठी बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी सोयीचे ठिकाण मिळावे म्हणून, दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवले होते. मात्र तपासणी दरम्यान मूळ प्रमाणपत्र व पुनर्तपासणीच्या अहवालात या शिक्षकांच्या दिव्यांगत्व टक्केवारीत फरक आढळून आला होता. त्यामुळे या सर्व गुरुजींची मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या दालनात सुनावणी झाली. या सुनावणीत आणि तपासणीत 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये ते दोषी आढळून आले. त्यामुळे बीडचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *