अजित पवारांचे शिंदे, फडणवीसांना आवाहन:आदित्य ठाकरे, प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शोधून काढा
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हल्ल्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे?, हे शोधून काढा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हल्ल्यांमागील मास्टरमाईंडला कठोरातील कठोर शासन करावे. जेणेकरुन यापुढे असे हल्ले होणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
तातडीने लक्ष घातले पाहीजे
आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, खासदार राजीव सातव हे तरुण नेतृत्व होते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी होते. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अचानक त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याप्रकरणात लक्ष घातले पाहीजे. आरोपीला कठोरातील कठोर शासन व्हायला हवे. अशाप्रकारचे हल्ले कोणावरही झाले नाही पाहिजे.
विरोधकांना पुरेसे संरक्षण हवे
अजित पवार म्हणाले, महिलांना आपण मान- सन्मान देतो. प्रज्ञा सातव या राजीव सातव यांचा वारसा पुढे नेत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्ला झाला. प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या हल्ल्यांमागे कोण मुख्य सुत्रधार आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. सत्ता कोणाचीही असली तरी विरोधकांना ही पुरेसे सरंक्षण मिळाले पाहिजे.
बंडखोरांच्या मनधरणीचा प्रयत्न
अजित पवार म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघात कोणाची बंडखोरी होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. हे राजकारण असून एकमेकांच्या भेटी घेणे चालूच राहणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी माझी भेट घेतली. फॉर्म भरताना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आमच्यासोबत होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना कधी प्रचारासाठी, रॅलीकरिता पाहिजे याबाबतची माहिती द्या, असे मी त्यांना सांगितले आहे. पुण्याचा अनेक वर्ष मी पालकमंत्री होतो. त्यामुळे अनेकांना मी वेळोवेळी साथ दिलेली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुकीतील पाठिंब्याबाबत आमचे बोलणे झालेले नाही. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने त्यांच्याशी संर्पक साधलेला आहे की नाही? याबाबत मला कल्पना नाही.
सतत निवडणुका नको
दरम्यान, अॅड.असीम सरोदे यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येत नाही तोपर्यंत पोटनिवडणुका घेणे बेकायदेशीर असल्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, कसबा व चिंचवड मतदारसंघात अशाप्रकारे कोणताही अपात्रतेचा प्रकार घडणार नाही. कोणी उद्या अपात्र ठरले आणि आमच्याकडे बहुमत आहे, सत्ता स्थापन करण्यासाठी संधी द्या, असे पक्षांनी सांगितले तर त्यावेळी राज्यपालांना संबंधितांना संधी द्यावे लागते. सतत निवडणूक घेण्यास राजकीय पक्ष किंवा नागरिक रिकामे नाही.
काऊ हग डे’बाबत बोलणे उचित नाही
केंद्र सरकारने 14 फेब्रवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने आपआपल्या पध्दतीने विचार करावा आणि सदबुध्दीला स्मरुन वागावे. ज्यांना जे वाटते त्याप्रमाणे ते वागतात. त्याबाबत आपण अधिक बोलणे उचित नाही.
काँग्रेसमधील घटना दुर्देवी
काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांत दुर्देवी घटना घडल्या. त्यातून चांगला मार्ग काढून हा विषय संपवावा. मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारची मोठया प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली आहे. यावर अजित पवार म्हणाले, हे सर्वसामन्यांचे सरकार असून त्याची जाहीरात केली पाहिजे. आम्ही पण सरकार मध्ये काम केले. मी अर्थमंत्री होतो, कुठे काम केले पाहिजे, कोणाला निधी दिला पाहिजे याबाबत मलाही जाण आहे. लोकाभिमुख सरकारने वंचित लोकांसाठी काम करणे आवश्यक आहे.