महाराष्ट्राच्या राजकारणाचा मानबिंदू दादा’साहेब’-निलंगेकर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,पाटबंधारे खात्यामध्ये ऐतिहासिक काम करणारे मंत्री,निलंगा तालुक्याचे खरेखुरे पालक,निलंगा ही आमची ओळख निर्माण करून देणारे आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते, औरंगाबाद हायकोर्टचे शिल्पकार,1931 ते 2020 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली विशेष पकड असलेले एक स्वच्छ नेते,स्वतःहून राजीनामा दिलेले स्वाभिमानी मुख्यमंत्री,राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य आदी पदे यशस्वीपणे पार पाडणारे कर्तबगार मंत्री,मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल खाते यशस्वीपणे सांभाळणारे एक जबरदस्त मंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळून महाराष्ट्रासमोर स्वच्छ चेहरा देणारे नेते,अंगावर पांढरे शुभ्र धोतर,जाकीट परिधान करून आपली स्वच्छ आणि ग्रामीण प्रतिमा निर्माण करणारे,बेडरूम पर्यंत कार्यकर्त्यांना प्रवेश देणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते म्हणून ओळख असलेले डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 9 फेब्रुवारी रोजी होत आहे..
निलंगेकर साहेब जाऊन आज 3 वर्ष होत आहेत..3 वर्षात असा एकही दिवस गेला नाही,जिथे निलंगेकर साहेबांची आठवण झाली नाही..आज त्यांनी उभारलेली पाटबंधारेचे जाळे पाहिले की वाटते साहेब नसते तर या भागातील शेतकरी आज जो काही सधन दिसतोय तो दिसला असता का?पाण्याखाली असलेले जमिनीचे क्षेत्र आज त्याची साक्ष देत आहे..शिस्तप्रिय, वक्तशीर आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून त्यांची ख्याती होती. विधानसभेत दहा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. विविध खात्यांचे मंत्री आणि अल्पकाळ मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. सर्वांना एकत्र ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राजकीय जीवनात उपयोगी ठरला. काँग्रेसशी ते एकनिष्ठ राहिले,पक्ष गद्दारी त्यांच्या रक्ताला कधीही शिवली नाही..पक्षाची पडझड होत असतानाही त्यांनी कधीच आपली निष्ठा बदलली नाही.आजच्या नेत्यांकडे पाहिले की वाटते यांच्या ठायी निष्ठा कुठे आहेत की नाही..सकाळी एका पक्षात,दुपारी एका पक्षात जाणाऱ्या नेत्यांनी एकदा शिवाजीराव पाटील निलंगेकर,शंकरराव चव्हाण,यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील या नेत्यांचा इतिहास वाचायला हवा..निलंग्यासारख्या मागास भागात शिक्षणाची गंगा नेत, त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या.,मलाही त्यांच्या संस्थेत शिक्षण घेता आले..प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणारे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध त्यांनी घेतला होता केवळ विकासाची।चर्चा करत आयुष्य जगणारा हा स्वच्छ प्रतिमेचा नेता आमचे भूषण आहे..
सत्तेच्या प्रांगणात कधीही, कुणासमोरही न झुकणारे दादा आमचे आदर्श होते..निलंग्याच्या प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ राहते असे दादा खरंच आज आठवत राहातात…शेवटी शेवटी दादांची थोडीशी स्मृती विस्मरणात गेली होती तरीही मुंबईच्या पक्षाच्या बैठकीला दादानी हजेरी लावली होती..दादांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय केले..पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी केलेली कामे आजही शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवत आहेत..दादांनी स्वतःच्या चारित्र्याला खूप सांभाळलं..अपेयपान आणि निषिद्ध खाद्य त्यांनी केलंच नाही म्हणून दादा आज राजकारण्यांचे आदर्श आहेत.राजकारणात आता असे मैलाचे दगड खूप कमी आहेत..पावलापावलावर चकल्या देणाऱ्या,मोहाला बळी पडणाऱ्या राजकारणात दादा साफसूतरे राहिले..स्वच्छता हा त्यांचा महत्वाचा गुण होता…. ते मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या बेडरूम पर्यंत जाऊन बोलण्याचा योग आला..दादाशी बोलून बाहेर पडलो की मी महाराष्ट्रातील आजच्या राजकारण्याशी तुलना करत असे..इतकी निरपेक्ष,निष्कलंक माणसे आज राजकारणात दिसत नाहीत..दादांना फक्त एक कलंक लागला,तो खरा की खोटा याचा विचारही न करता त्यांनी राजीनामा दिला.त्याच बेसवर ते आज ताठ मानेने उभे आहेत..पद,प्रतिष्ठा राजकारणात महत्वाची असते त्यांनी ती जपली..संस्थात्मक आणि पाटबंधाऱ्याचे जाळे त्यांनी निर्माण केले..ज्यांना दादांना जवळून पहायचे आहे आणि बोलायचे आहे, त्यांनी एकदा त्यांच्या स्पेशल संग्रहालयाला भेट द्यावी..दादा राजकारणात दादा माणूस म्हणूनच जगत आले..मला अजूनही माझे बालपण आठवते,दादा माझ्या गावात यायचे म्हटले की,स्त्रिया तासनतास डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन उभ्या असायच्या..स्वागतासाठी गावेच्या गावे सज्ज असायची..त्यांच्या वागण्या,बोलण्यात कमालीची गोडी होती..तासनतास बोलत राहावे वाटायचे..दादांच आयुष्य प्रचंड समाधानच होत..
राजकारणात एक दरारा होता,गांधी कुटुंबाशी त्यांची पक्की नाळ होती..राजकारणात आता अश्या नेत्यांची वानवा आहे..महाराष्ट्राचे राजकारणात आज रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत,अश्या परिस्थितीत दादा मला स्थितप्रज्ञासारखे वाटतात..आजही मी महाराष्ट्रात फिरताना अनेक कार्यालयात,रेस्ट हाऊसवर काम करणारे कर्मचारी भेटले की,निलंगेकर साहेबामुळे आम्ही आहोत हे सांगितले की ऊर भरून येतो..निलंगा येथील आहोत असे सांगताच निलंगेकरांचा निलंगा का?असे म्हटले की मान ताठ होते,आमची ओळख निर्माण करणाऱ्या आणि स्वाभिमान जपत राजकारण करणाऱ्या दादांचे आज स्मारक होत आहे,हे निलंगेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे..या निमित्ताने त्यांच्या स्मृती जपता येणार आहेत,त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे कुटुंब पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे,मात्र त्यांच्या विचारासारखे प्रत्येकाला जगता यायला हवे..आमची ओळख निर्माण करणाऱ्या दादांच्या विचाराला पुढे नेण्यासाठी आपण सगळे राजकीय मतभेद विसरून एक होऊ या…राजकारणातील मानबिंदू असलेल्या दादा’साहेब’ यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जावू या…
@ संजय जेवरीकर
ज्येष्ठ पत्रकार