• Tue. Apr 29th, 2025

बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक

Byjantaadmin

Jan 30, 2023

दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असं ते म्हणाले. अकोल्यात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा-बाबांचं पीक फोफावलं आहे. पळपुटा आणि अक्कलशून्य असलेला बागेश्वर बाबा, त्याला श्याम मानव यांनी ४० लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलतो आहे. आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वत: भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केलं आहे. मला असं वाटतं की वारकरी सांप्रदाय काय आहे, हे या वेड्याला माहिती नाही”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

“धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे. ”अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे” अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा”, असेही ते म्हणाले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाला होता?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed