मुंबई : मुंबई महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला ते बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मोदी यांच्या मुंबईतील भेटीगाठी वाढल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
बोहरा समाजाच्या वतीने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याचे समजते. यासंबंधी बोहरी समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन या कार्यक्रमाची माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी मोदी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना भाजपच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता पुन्हा मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत मोठ्या संख्येने बोहरी समाज आहे. या समाजाला आपलेसे करण्यासाठीच हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळवायची असल्यास त्यांना मुंबईत राहणाऱ्या सर्व धर्मांच्या तसेच समाजाच्या मतदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठीच हा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे.