दोन वर्षांमध्ये ६७ हजार ६४४ कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी महावितरणने राज्यातील पावणेतीन कोटी वीज ग्राहकांवर २५ टक्के वीज दरवाढ लादण्याचा घाट घातला आहे. २०२३-२४ व २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे १४ आणि ११ टक्के दरवाढ प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. मात्र एकूण दोन वर्षांचा हिशेब केल्यास ही दरवाढ सरासरी २.५५ रु. प्रतियुनिट इतकी म्हणजे ३७ टक्क्यांपर्यंत जाते, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. सरकारने यात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली
महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी २०२३-२४ मध्ये ८.९० रु. प्रतियुनिट व २०२४-२५ मध्ये ९.९२ रु. प्रतियुनिट याप्रमाणे दरनिश्चित करण्याची मागणी नियामक आयोगाकडे केली आहे. सरासरी वाढ दाखवताना अनुक्रमे १४% व ११% दाखवली आहे. पण ही ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी आकडेवारी आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रु. प्रतियुनिट म्हणजे ३७% आहे, असा दावा प्रताप होगाडे यांनी केला आहे.
वीज नियामक आयोगाने २०२०-२१ वर्षापासून महावितरणसाठी बहुवार्षिक दररचना मंजूर करताना जो अपेक्षित महसूल अंदाजित केला होता, ते उद्दिष्ट कोरोना व कोळशाच्या संकटामुळे साध्य झाले नाही. त्यामुळे मागील ४ आर्थिक वर्षांतील महसुली तूट व आगामी २ वर्षांतील अपेक्षित तुटीचा विचार करता दोन वर्षांत ही भरपाई करण्यासाठी महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव दिला.
आयोगाकडे तक्रारी करा इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आधीच वीज महाग आहे. आता ३७ % दरवाढ झाली तर सामान्य ग्राहकांचा बळी जाईल. अनेक उद्योगही राज्याबाहेर जातील. त्यामुळे ही दरवाढ रोखण्यासाठी नियामक आयोगाकडे मोठ्या संख्येने हरकती, तक्रारी नोंदवा. – प्रताप होगाडे, अध्यक्ष, वीज ग्राहक संघटना