सी व्होटर संस्थेचा लोकसभा निवडणुकीसंदर्भातील अहवाल मी वाचला आहे. त्यानुसार देशात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
अहवालामधील देशातील तसेच महाराष्ट्रातील आकडेवारी पाहून सत्ताधारी पक्षाच्या हातात पुन्हा सत्ता जाईल, असे वाटत नाही. सत्ताधारी पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला.
अहवाल दिशा दाखवणारा
आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, गेल्या 5-10 वर्षातील सी व्होटरचे अहवाल बघितले तर त्यांचे अंदाज अचूक ठरत असल्याचे दिसते. आतादेखील या अहवालाने विरोधकांना एक दिशा देण्याचे काम केले आहे. ही आकडेवारी सत्ताधारी पक्षांच्या सोईची नाही. त्यांची चिंता वाढवणारी आहे.
शरद पवार म्हणाले, अहवालानुसार देशात काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार राहणार नाही, असे दिसतेय. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोक गांभीर्याने घेतात, हे देखील या अहवालातून समोर आले आहे.
विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न
शरद पवार म्हणाले, सी व्होटरच्या अहवालाने विरोधकांना दिशा दाखवली आह. भाजपविरोधात देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी स्वत: अनेक जणांशी बोलत आहे. मात्र, काही स्थानिक मुद्द्यांवरुन अडथळे येत आहेत.
जसे की, केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्यांसोबत सत्ता स्थापन केली आहे. तिथे काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, देशात आम्ही काँग्रेससोबत आहोत. त्यामुळे केरळमध्ये लोकसभेच्या जागा कशा लढवायच्या, असा पेच आहे. दोन दिवसांत संसदेचे अधिवेशन सुरू होईल. तेव्हा यासंदर्भात अधिक चर्चा करता येईल.