संशोधक- प्राध्यापकांना पेटंट मिळवण्याची संधी- डॉ. भरत सूर्यवंशी
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालय आणि महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने intellectual property right (IPR) अर्थात बौद्धिक संपदेचा अधिकार या विषयावर राज्यस्तरीय एक दिवशीय कार्यशाळा महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेल प्रॉपर्टी राईट मॅनेजमेंट, नागपूर येथील असिस्टंट कंट्रोलर पेटंट डिझाईन प्रमुख डॉ. भरत सूर्यवंशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी बौद्धिक संपदेच्या अधिकारांतर्गत बौद्धिक संपदा म्हणजे काय, त्याची वेगवेगळे प्रकार, बौद्धिक संपदा मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन, लहान लहान बाबीवर लक्ष केंद्रित करून आपल्याकडे निसर्ग निर्मित असणाऱ्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून हे अधिकार मिळवता येतात. ते मिळवण्याची संधी ही प्रामुख्याने संशोधक आणि प्राध्यापकांना आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपुके हे होते. त्यांनीही याप्रसंगी आपल्याकडे असलेल्या बौद्धिक संपदेचा अधिकार पेटंट स्वरुपात पुढे आणावेत असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भगवान वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. नरेश पिनमकर यांनी तर आभार डॉ. अजित मुळजकर यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.