संस्कृती आणि कला विश्वाला प्रवाहित करण्यासाठी साहित्याची गरज – हृषीकेश सुलभ
निलंगा: भारतीय स्वातंत्र्य आंदोलन काळातील नेतृत्व व जनतेची साहित्य, कला आणि संस्कृतीशी नाळ जोडलेली होती म्हणून देशप्रेमाची स्वातंत्र्याची भावना जनसामान्यांमध्ये प्रवाहीत होती. स्वातंत्र्य चळवळीला आणि ब्रिटीश पारतंत्र्यातून मुक्त होण्याची भावना प्रवाहीत ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून झाले असे मत राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी पाटना येथील प्रसिध्द हिंदी साहित्यिक हृषीकेश सुलभ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हिंदी भाषा, साहित्य, फिल्म आणि पत्रकारिता या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या चर्चासत्राचे बिजभाषक म्हणून दिल्ली येथील प्रसिध्द उपन्यासकार तथा पत्रकार मा. प्रदिप सौरभ हे उपस्थीत होते. स्वातंत्र्य आंदोलनाला जनांदोलनात परिवर्तीत करण्याचे काम खऱ्या अर्थाने हिंदी भाषेने केले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व स्विकारल्यानंतर भारतातील बहुभाषिक लोकांना हिंदी भाषेच्या माध्यमातून जोडण्याचे काम केले. स्वातंत्र्य आंदोलनाला हिंदी भाषेप्रमाणेच पत्रकारीतेच्या माध्यमातूनही प्रेरीत करण्याचे काम झाले. तत्कालीन पत्रकारीता ही स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाच्या भावनेने ओतप्रोत भरलेली होती त्यामुळे ही भावना लोकांमध्ये कायम तेवत ठेवण्याचे काम तत्कालीन वृत्तपत्रांनी केले होते. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर हे उपस्थित होते त्यांनी याप्रसंगी हैदराबाद संस्थानाच्या विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनातील स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या योगदानाला उजाळा देऊन तत्कालीन स्वातंत्र्य आंदोलनातील हिंदी भाषा, साहित्य, पत्रकारितेच्या योगदानावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. माधव कोलपूके यानीही आपली भुमिका विशद केली. तर या चर्चासत्राचे संयोजन सचिव डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी प्रास्ताविकातून चर्चासत्राच्या विषयाची भुमिका सविस्तर पणे मांडली.
या चर्चासत्राच्या विविध सत्रांमध्ये साधन व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. सुधाकर शेंडगे, रेणापूर येथील डॉ. सतीश यादव, किनगांव येथील प्राचार्य, डॉ. बबन बोडके,परभणी येथील डॉ. सुजीतसिंह परीहार या अभ्यासकांनी चर्चासत्रातील विविध विषयांच्या अनूषंगाने सविस्तर असे मार्गदर्शन केले.
चर्चासत्राच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहूणे म्हणून महाविद्यालयाचे सेवानिवृत्त हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागनाथ कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. या चर्चासत्रासाठी उपस्थितांचे आभार हिंदी विभाग प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड यांनी व्यक्त केले. तर सुत्रसंचलन डॉ. अजीत मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन सचीव डॉ. गोविंद शिवशेट्टे, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. एम. एल. मुल्ला, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
संस्कृती आणि कला विश्वाला प्रवाहित करण्यासाठी साहित्याची गरज – हृषीकेश सुलभ
