मुंबई;-मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या अवमानावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यावरून महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला होता. राज्यपालानंतर भाजपा आणि शिंदे गट आणि इतरही काही पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती.
या घटना ताज्या असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच राज्यपालांच्या मनात नेमकं काय चाललंय? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? असा सवाल मिटकरींनी विचारला.
“राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्यपालांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत खुलासा करतील का?” असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला आहे.
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले…
राज्यपाल कोश्यारी यांनी आज राजभवनातील कार्यक्रमात भाषण केलं. आपल्या भाषणात कोश्यारी हिंदी भाषेत म्हणाले, “आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहिए…लेकीन मेरे घर में नही… दुसरों के घर में होने चाहिए…” यावेळी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे.