पिंपरी चिंचवड मधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राज्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये प्रकृती नाजूक असताना देखील आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्याहून ॲम्बुलन्सने मुंबईला मतदानासाठी गेले होते. भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ओळख करून देत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या या वृत्तीचे कौतुक केले होते. प्रसार माध्यमांमध्ये देखील मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांची चांगली चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच मुक्ता टिळक यांचेही उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर आता लक्ष्मण जगताप यांची देखील प्राणज्योत मालवली.
राजकीय प्रवास :
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा लक्ष्मण जगताप यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
- त्यांनी सर्वात आधी 1986 साली नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले.
- त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- नगसेवक पदापासून ते स्थायी समिती सभापती, महापौर असे अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.
- 2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य बनले.
- 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून काम केले.
- 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला.
- यानंतर लक्ष्मण जगताप यांनी भाजपत प्रवेश केला. आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्या नंतर सलग दुसऱ्यांदा ते विजयी झाले.
- दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दु. 3 ते 6 या वेळेत पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर पिंपरी गुरव येथे अंतिम संस्कार होणार आहेत.