मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांनी आज नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. मुख्यमंत्री सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसंच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते. कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवनात
याआधी 27 डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. त्या दिवशी भाजप आमदारांसोबत शिंदे गटाचे आमदार ही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्या दिवशी फक्त भाजप आमदार संघ कार्यालयात आले होते. त्या दिवशीचे उपक्रम फक्त भाजप आमदारांसाठी होता असे भाजपने स्पष्ट केले होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार यांच्यासमोर नतमस्तक झाले.
आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. इथे आल्यावर समाधान आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत.”