आयटीआयमध्ये रेणापूरची मदिया देशात द्वितीय; पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
गरिबीवर मात करीत घेतले शिक्षण
लातूर (मोईज सितारी);- गरीब परिस्थितीवर जिद्दीने मात करीत येथील हिने मदिया खदीर सय्यद हिने आयटीआयमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.त्या बद्दल तिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दिल्लीतील विज्ञान भवनात सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा सुरू असताना रेणापूर येथील बाजार चौकात फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

रेणापूर येथील मदिया सय्यद हिचे वडील खदीर जमाल (मिस्त्री) हे व्यवसायाने बांधकाम मजूर आहेत. त्यांना पाच मुलीच आहेत. हलाकीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या सर्व मुलींना शिक्षित आहेत. त्यात मदिया ही बालपणापासूनच अत्यंत हुशार होती. दहावीनंतर तिने येथील स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री (एनएसक्यूएफ) विभागात प्रवेश घेतला. कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील
प्रशिक्षण महासंचालनालयाच्या कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत तिने पहिल्या वर्षी (२०२३-२४) च्या परीक्षेत ६०० पैकी ५९६ गुण मिळविले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी (२०२४-२५) च्या परीक्षेत ६०० पैकी ५९८ गुण घेतले. ९९.६६ टक्के गुण घेत वीजतंत्री विभागात ती देशात द्वितीय आली. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तिचा दिल्लीतील विज्ञान भवनात सत्कार झाला. दरम्यान तिचा सत्कार सोहळा पाहून रेणापुरात शेख खुहुस, आजम सय्यद, जावेद छोटुमियाँ, पंडित बोरूळ, शेख वाजीद, पांडुरंग कोडगीर, राजाभाऊ डावळे, संदीपान यशवंत, आर्दीनी वाजार चौकात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. के. पडवळ, शिल्पनिदेशक अरविंद ताडेवाड, एजाज मुजावर, आदींनी कौतुक केले तर मादीया याच्या यशाबद्दल संपूर्ण लातूर जिल्ह्यात कौतुक होत आहे….
