लोकशाही व संविधानावरील मुलतत्ववादी प्रतिक्रांतीचा विखारी हल्ला उधळून लावा ! -रामकुमार रायवाडीकर
लातूर, ;- भारतीय लोकशाही व संविधानावर येथील मुलतत्ववाद्यांकडून, झालेल्या प्रति क्रांतीचा विखारी हल्ला सनदशीर मार्गाने एकसंघपणे उधळून लावावा, असे जाहीर आवाहन अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साथी रामकुमार रायवाडी कर यांनी केले. ते आज २ ऑक्टोबर रोजी म. गांधी जंयती व धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त, डॉ. आंबेडकर पार्क लातर येथे अभिवादन प्रसंगी, सहभागी उपस्थित कार्यकर्त्यांशी संबोधन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास, पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना रामकुमार रायवाडीकर पुढे म्हणाले की, संपूर्ण देश आणि संसद आज एका जातीयवादी भयाच्या दहशतीखाली आहे. अशावेळी प्रत्येकांनी आपला वैचारिक पुरुषार्थ व लोकशाहीवादी नैतिक चारित्र्य पणाला लावले पाहिजे. सरकारी शिक्षण आणि नोक-यांचा नायनाट करून, खोट्या आरक्षणाच्या फसवे मृगजळाचे जाळे फेकून, येथे समाजा-समाजात वैर आणि आतंक पेरले जात आहे. आणि माणस- माणसांच्याच जीवावर उठविली जात आहे. खरे तर येथील युवक, युवती व संपूर्ण देशाचे उज्वल भवितव्य हे देव, धर्म, अनिष्ट रुढी-परंपरा व जातीय विव्देशात नाही. तर ते निकोप लोकशाही व संविधानात आहे. तेव्हा अशा मुठभर अनैतिक सत्तापिपासूच्यां स्वार्थाचा धोका वेळीच ओळखून, आपल्या लोकशाहीचीं मुलभूत आयुध अबाधित ठेवावेत, असेही रामकुमार रायवाडीकर म्हणाले.यावेळी अखिल भारतीय परिट-धोबी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री गणपतराव तेलंगे, निवृत्त सहायक जिल्हा सरकारी वकील अँड. डी. एन. भालेराव, ज्येष्ठ पत्रकार बाळ होळीकर, सोशालिस्ट पार्टी ( इं.) चे लातूर जिल्हाध्यक्ष साथी संजय व्यवहारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शाम वरयानी, युवक कार्यकर्ते सूरज भुसारे- पाटील, ज्येष्ठ नागरिक गोपाळतात्या चिकाटे, गुरुकृपाचे संचालक प्रा. दिनकर कांबळे, आयु. संदिप लामतुरे, संतोष सोनवणे, नागेशराव जोगदंड, सरफराज खुदबोद्दीन पठाण, अगंदराव कांबळे, सुफी सय्यद शमसोद्दीन, आकाश कांबळे, कु. अवनी चिकाटे, अनुरथ सितापे, चंद्रकांत टिळक, प्रा. भास्कर सुरवसे आदी सहभागी झाले होते.
