• Wed. Oct 15th, 2025

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; पदवीधरांनी मतदार यादीमध्ये  नव्याने नोंदणी करणे आवश्यक – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Oct 1, 2025

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; पदवीधरांनी मतदार यादीमध्ये  नव्याने नोंदणी करणे आवश्यक – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         मतदार यादीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक

लातूर, दि. 30 : पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. यापूर्वी झालेल्‍या पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मा.जिल्‍हाधिकारी,लातूर श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी गणेश पवार यांनी पदवीधर मतदार नोंदणी बाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. कोणीही पात्र मतदार मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया,  मतदार नोंदणी अधिकारी,  सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी ह्यांची माहिती देणारी अनुसूची 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. पवार म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. नमुना-18 सोबत पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करताना पदनिर्देशित अधिकाऱ्यास मूळ प्रमाणपत्र/गुणपत्रिका तपासणीसाठी दाखविणे आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र/गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित किंवा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत सादर करणे आवश्यक आहे. याकरीता मा.भारत निवडणूक आयोग यांनी अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठांतून 01 नोव्हेंबर, 2025 पूर्वी किमान 3 वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीची समकक्ष पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्षपणे किंवा टपालाने सादर करता येईल. एक गठ्ठा पद्ध्तीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कुटुंबातील एका सदस्यास कुंटुंबातील इतर सदस्याचा अर्ज सादर करता येईल.

5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी लातूर जिल्‍हात 83 मतदान केंद्र व 05 सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 88 मतदान केंद्र होते. त्यावेळी 38198 एवढे मतदार होते. मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर सर्व जिल्हाधिकारी व अपर आयुक्त (सा.प्र) हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार मिळून विभागातील 130 अधिकाऱ्यांची सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 106 पदनिर्देशित अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसिलदार (निवडणूक), छत्रपती संभाजीनगरसाठी मनपाचे सहायक आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे.

1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम

 जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनप्रसिध्‍दी- बुधवार 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनप्रसिध्‍दी- शनिवार 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – गुरूवार 6 नोव्हेंबर,  हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार 20 नोव्हेंबर,  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्‍दी- मंगळवार 25 नोव्हेंबर,  दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी- मंगळवार 30 डिसेंबर 2025.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *