निलंगा पंचायत समितीत माजी कृषी अधिकारीच आता बी.डी.ओ.
निलंगा : निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सतीश गोविंदराव पाटील यांनी गटविकास अधिकारी (बी.डी. ओ) पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 18 सप्टेंबर रोजी निलंगा पंचायत समिती कार्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला.
एम.एस्सी. (कृषी) पदवी घेतल्यानंतर पाटील यांची पहिलीच नियुक्ती 1999 मध्ये निलंगा पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून झाली होती. तब्बल 12 वर्षे त्यांनी या तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून कार्य करताना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. कृषी विभागाच्या विविध योजना गरजू व पात्र शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.या काळात तालुक्याची भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीची त्यांना सखोल जाण झाली. उत्कृष्ट कामगिरीमुळे 2015 मध्ये त्यांची सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून बीड जिल्ह्यातील परळी येथे नियुक्ती झाली. त्यानंतर 2019 मध्ये ते औसा पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांनी रेणापूर येथे यशस्वीपणे काम पाहिले.आता निलंगा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यामुळे तालुक्यातील अनेकांनी कार्यालयात येऊन त्यांचे मनापासून स्वागत केले, अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

