लातूर मनपा क्षेत्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
लातूर/ प्रतिनिधी: केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मनपा आरोग्य विभागाच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे.
बादाडे नगर,तावरजा कॉलनीतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे पालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ३३७ लाभार्थ्यांची उपस्थिती होती. या अभियान अंतर्गत विविध प्रकारच्या १६ आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत. दि. २३ रोजी खणी भागातील गौतम नगर प्राथमिक आरोग्य केंद्र,दि. २४ रोजी मंठाळे नगर मधील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व इंडिया नगर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच दि. २५ रोजी बौद्ध नगर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र, दि. २६ रोजी राजीव नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, दि. २७ रोजी प्रकाश नगर व दि. २९ रोजी सिद्धार्थ सोसायटीतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे हे अभियान राबविले जाणार आहे.
या अभियानात NCD अंतर्गत रक्तदाब, मधुमेह तपासणी, गरोदर माता तपासणी, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तपासणी,बाल रुग्ण तपासणी,मुखाचा कर्करोग तपासणी,योगासत्र, टीबी तपासणी, एक्स-रे सुविधा,महिला आणि बालकांना पोषक आहार समुपदेशन,मानसोपचार सल्ला,व्यसनमुक्ती समुपदेशन,किशोरवयीन मुलींना व मातांना मासिक पाळी समुपदेशन,टेली मेडिसिन सेवा, रक्तक्षय तपासणी,प्रयोगशाळा तपासणी, मोफत औषधोपचार,नेत्र रुग्ण तपासणी,आयुष्मान कार्ड काढणे या १६ प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.शहरातील नागरिकांनी नियोजित ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती व नोडल अधिकारी डॉ.श्यामा जाधव यांनी केले आहे.

