निलंग्यात चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित
निलंगा : नवरात्रोत्सवानिमित्ताने घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामुळे पाण्याची अधिक गरज भासत असताना शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने चार दिवसांपासून निर्जळीचे संकट आले आहे. निलंगा शहराला माकणी प्रकल्पावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने सन २०२० मध्ये माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निधी आणला व सुमारे कोट्यवधीचा खर्चकरून जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, वारंवार ही जलवाहिनी फुटत आहे. परिणामी, शहराला चार पाच दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद : ऐन सणाच्या तोंडावर पाण्याची निर्माण झाली समस्या

महिलांतून नाराजी….सध्या घरोघर कपडे धुणे, भांडी, घराची सवच्छता अशा कामांत महिला व्यस्त आहेत. मात्र, पाणी नसल्याने मोठी अडचण येत आहे. त्यामुळे महिलांतून संताप व्यक्त होत आहे. त्वरित जलवाहिनी जोडणी करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
तांत्रिक बिघाड न निघाल्याने अनेकदा पाणीपुरवठा बंद होतो. त्यातच नांदुर्गा गावाजवळील काकडे यांच्या शेताजवळील ओढ्यात गुरुवारी पाइपलाइन फुटली. त्या भागात रस्त्याचे काम जेसीबीद्वारे सुरू असताना जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे
