आधार नाही म्हणून राज्यातील
विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाहीत
आमदार धिरज देशमुख यांच्या प्रश्नानंतर शिक्षणमंत्र्यांनी दिली ग्वाही; लातूर जिल्ह्यातील आधार संचाच्या त्रुटी तातडीने सोडविणार
लातूर :-पुरेशा आधार केंद्राअभावी लातूर जिल्ह्यातील एक ते दीड लाख विद्यार्थी आधार कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, केवळ आधार कार्ड नसल्याने हे विद्यार्थी शालेय पोषण आहार सारख्या महत्वाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. या संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधत लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी आधार नाही म्हणून राज्यातील विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाहीत. शिवाय, लातूर जिल्ह्यातील आधार संचाच्या त्रुटी तातडीने सोडविल्या जातील, असे जाहीर केले.
अपुऱ्या आधार केंद्रामुळे शालेय विद्यार्थी आधार कार्डपासून आणि विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. याबाबत आमदार श्री. धिरज देशमुख यांनी बुधवारी (ता. २१) हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. लातूर जिल्ह्यात केवळ ५५ आधार केंद्र आहेत. तेथील नागरिकांची गर्दी, कर्मचाऱ्यांचा अभाव, नादुरुस्त मशीन, इंटरनेटची अनुपलब्धता अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी, पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
लातूरचे जिल्हाधिकारी यांनी आधार कार्डसाठी लातूर जिल्ह्यात आणखी २४१ आधार मशीनची गरज आहे, असे पत्र सरकारकडे पाठवले आहे. याचीही पूर्तता केव्हा होणार, असा प्रश्न आमदार श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी केला. यानंतर बोलताना शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी लातूर जिल्ह्यातील आधार संचाबाबत ज्या काही त्रुटी आहेत, त्या तातडीने दूर केल्या जातील. यासाठी शासनाने नेमलेल्या आयटीआय कंपनीला आम्ही तत्काळ सूचना करू. नादुरुस्त असलेले आधार संच बदलून देऊ. ३१ डिसेंबरच्या आत सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पूर्ण होतील, याची दक्षता घेऊ, असे जाहीर केले.