• Sat. May 3rd, 2025

मराठा समाजाच्या शैक्षणिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Dec 21, 2022

नागपूर, : मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.

येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सायंकाळी हा सोहळा पार पडला. विधान परिषद सदस्य आ. प्रवीण दटके, राजे डॉ. मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, श्रीकांत शिंदे, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठा समाज व मराठा समाजाशी संबंधित प्रत्येक जिल्ह्यातील संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल करीत आहे. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री ही सेवेची संधी मला मिळाली. मला मिळालेली संधी ही सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. आपला माणूस म्हणून लोक माझ्याकडे बघतात. राज्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आमचे सरकार हे सामान्यांच्या मनातले सरकार आहे,असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *