• Mon. Jul 14th, 2025

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना जबर धक्का, आयकर खात्याकडून नोटीस

Byjantaadmin

Jul 10, 2025

महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा संजय शिरसाट आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेलप्रकरणात संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे समजते. संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही कबुली दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याची वक्रदृष्टी वळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तर आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जाहीर कबुली संजय शिरसाट यांनी दिली आहे येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्यासही देखील त्यांनी म्हटले आहे. 

पैसे कमावणे सोपं, ते वापरणे अवघड

2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं विचारल्याचे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं, अशी माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली आहे. पैसे कमावणे सोपं आहे. मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

विट्स हॉटेल प्रकरणावरून संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्यावेदांत म्हणजेच विट्स  हॉटेलच्या (VITS Hotel) लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते.  संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटी रुपये असतानाही, केवळ 67 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, विरोधकांनी हा विषय लावून धरला होता. पावसाळी अधिवेशनात सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय  समितीतर्फे चौकशीची घोषणा केली होती.

त्यानंतर आता संजय शिरसाट यांना आयकर खात्याची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता विटस हॉटेल प्रकरणात संजय शिरसाट यांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार आणि त्यांची चौकशी केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि त्यापाठोपाठ आयकर खात्याची नोटीस, ही अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. या सगळ्याचे महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *