ठिकाणाचे सुशोभीकरण
लातूर /प्रतिनिधी :शहरातील प्रभाग क्रमांक १३, झोन ए मधील संविधान चौक येथे नेहमी कचरा पडलेला असायचा. त्या ठिकाणाचे सुशोभीकरण करून पालिकेच्या वतीने तेथे वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे.
आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन शहर स्वच्छतेबाबत निर्देश दिले होते. त्यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मध्ये “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ “ या अंतर्गत ए झोनमधील ७० कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. या अंतर्गत विलासराव देशमुख मार्ग, संविधान चौक ते पाच नंबर चौक हा पूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला. चौधरी नगर येथील नाल्याची स्वच्छता करून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. त्या परिसरातील १३ टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे,सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, मुन्ना पाल, चंदू साबदे यांनी सहभाग नोंदवला. मनपाचे ५ ट्रॅक्टर,बोबकेट मशीन व फवारणी मशीनचा स्वच्छतेसाठी वापर करण्यात आला.
संविधान चौकात नेहमी कचरा पडलेला असायचा. त्या ठिकाणाचे डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते सुशोभीकरण करण्यात आले. तेथे वाचन कट्टा तयार करण्यात आला. यावेळी स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, स्वच्छता निरीक्षक धनराज गायकवाड यांची उपस्थिती होती.
शहरात नेहमी कचरा पडणाऱ्या ठिकाणांची याच पद्धतीने स्वच्छता केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वर्गीकरण करून घंटागाड्यांना द्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. खानसोळे यांनी यावेळी बोलताना केले.
