माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मागणीला आरोग्य राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई (प्रतिनिधी)
थॅलेसेमिया रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात
स्वतंत्र कक्ष, आणि राखीव बेडची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी आज माजी
मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली. आरोग्य
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत
सदरील सुविधा उपलब्ध करण्याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करील असे
आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज गुरुवार दि. ३ जुलै
२५ रोजी विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान थॅलेसेमिया या गंभीर
आजाराच्या संदर्भाने चर्चा सुरू होती, या चर्चेत सहभागी होताना माजी
मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, थॅलेसेमिया हा औषध
उपचाराने बरा न होणारा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजार आहे, हा रोग होऊ नये
म्हणून देश आणि राज्य पातळीवर काम सुरू आहे ही चांगली गोष्ट आहे.
थॅलेसेमिया रुग्णसंखेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर
आहे? आणि राज्यात कोणत्या जिल्ह्यात हे रुग्ण अधिक आहेत ? असे प्रश्न
उपस्थित करून, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांसाठी विशेष कक्ष
स्थापन करावा, त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी त्यांच्यासाठी किमान
काही बेड तरी राखीव ठेवावेत, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांनी यावेळी केली.
