• Fri. May 2nd, 2025

50 खोके, एकदम OK:हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज घुमला

Byjantaadmin

Dec 19, 2022

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जोरदार आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी पुन्हा एकदा पन्नास खोके, एकदम ओके म्हणत शिंदे सरकारचा निषेध केला.

कर्नाटकच्या बेळगावमधील धरपकडीचेही नागपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी बोम्मई सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.

पायऱ्यांवरच मांडला ठिय्या

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला चोहोबाजूंनी घेरले. कर्नाटक सीमाप्रश्न, प्रकल्पांची पळवापळवी, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच कर्नाटक सरकार हाय हाय…बोम्मई सरकार हाय हाय…शिंदे सरकार हाय हाय…गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… पन्नास खोके, एकदम ओके म्हणत जोरदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

पवार, दानवेंचे नेतृत्व

नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय…शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी,मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

कर्नाटक सीमावादाचेही अधिवेशनात आज पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली. मात्र, तो अचानक रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले. ही दडपशाही असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत आपण सीमावादप्रकरणी पाठिशी असल्याचे सांगितले. या प्रकरणावर राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *