_लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात_
विहित कालावधीत, गुणवत्तापूर्ण कामे करण्यावर भर-अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख
• एक वर्षात 210 किलोमीटर रस्ते डांबरीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण
लातूर, दि. 19 (जिकामा) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लातूर मंडळ निर्मितीला एक वर्ष पूर्ण झाले असून या एका वर्षात 210 किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मंडळामध्ये होणारी सर्व कामे विहित कालावधीत व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी सांगितले.
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त बांधकाम भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. शेख बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. दोनचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. एकचे कार्यकारी अभियंता डी. बी. निळकंठ, उप अभियंता रोहन जाधव व उप अभियंता संजय सावंत यांच्यासह तिन्ही विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लातूर येथील सार्वजनिक बांधकाम मंडळच्या निर्मितीला 15 डिसेंबर 2022 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. एक वर्षापूर्वी याच दिवशी उस्मानाबाद मंडळाचे विभाजन होऊन लातूर विभाग क्र. 1 व क्र. 2 तसेच निलंगा विभाग या परिक्षेत्रासाठी लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाची निर्मिती करण्यात आली.
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. नवीन मंडळ कार्यालयाची इमारत येणाऱ्या वर्षात पूर्ण करण्यासोबतच लातूर मंडळाचा शासनस्तरावर असलेला प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी उप अभियंता श्री. जाधव, उप अभियंता श्री. सावंत यांनी विशेष लक्ष घालावे, अशा सूचना डॉ. शेख यांनी दिल्या.
कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी लातूर मंडळाच्या निर्मितीनंतर केलेल्या कामांचा आराखडा मांडला. श्री. निळकंठ यांनी शासनाने सुचविलेल्या विविध कामे गतीने करण्याकरीता प्रयत्नशील असल्याबाबत सांगितले.
पदोन्नत उपअभियंत्यांचा सत्कार
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या निर्मितीनंतर अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पदोन्नतीची प्रकरणे वेगाने निकाली काढण्यात येत आहेत. नुकतेच शाखा अभियंता पदावरून उपअभियंता पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या आठ अभियंत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन के. जी. कोकणे यांनी केले, बी. डी. कांबळे यांनी आभार मानले.