संशोधनातूनच समृद्धी शक्य आहे- डॅा. लक्ष्मीकांत सोनी
निलंगाः येथिल महाराष्ट्र महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि संशोधन प्रोत्साहन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय संशोधन प्रकल्प लेखन तंत्रे कार्यशाळेत साधनव्यक्ती म्हणून बोलताना दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे डॅा. लक्ष्मीकांत सोनी यांनी संशोधनाचे वाढते महत्व प्रतिपादित करताना संशोधनातूनच देशाची आर्थिक प्रगती आणि समृद्धी शक्य आहे असे अधोरेखित केले. पुढे बोलताना त्यांनी चांगल्या संशोधनाची व संशोधकांची नितांत गरज आहे असेही स्पष्ट केले. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील संशोधनाच्या विविध संधींवरही त्यांनी प्रकाश टाकला. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेचा अभ्यास करून उत्तम प्रकल्प कसे पूर्ण करावेत यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. माधव कोलपुके सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन प्रोत्साहन समितीचे समन्वयक डॅा. अजित मुळजकर उपस्थित होते. डॅा. कोलपुके सरांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले तर डॅा. मुळजकर यांनी संशोधनानेच भारत जगात आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॅा. सुर्यकात वाकळे, डॅा. नरेश पिनमकर, प्रा. संदीप सुर्यवंशी, प्रा. शिल्पा कांबळे, प्रा. वैभव सुर्यवंशी व प्रा. सपना मोरे आणि वाणिज्य विभागाचे १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. याच कार्यक्रमात वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या सावित्री-जिजाऊ-विवेकानंद निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षिस वितरणही संपन्न झाले. यात कु. गिता वाडकर हिला प्रथम, कु. प्रिती सगर हिला द्वितीय, कु. निकिता सोनटक्के हिला तृतीय तर कु. वैष्णवी गिरी व कु. पायल मोहिते यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाणिज्य मंडळाची अध्यक्ष कु. अंजुम शेख, सर्व पदाधिकारी, श्री सिद्धेश्वर कुंभार व श्री गणेश वाकळे आदिंनी परिश्रम घेतले.
