• Tue. Apr 29th, 2025

अजितदादांसोबतची बैठक सपंली, भेटीनंतर राजीनाम्यावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर

Byjantaadmin

Jan 6, 2025

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.दरम्यान आज सर्व पक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीचं निवेदन या भेटीवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात आलं. आपण या प्रकरणात लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांनी दिलं आहे. तसेच आम्ही उद्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहोत अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज अचानक मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं. या भेटीनंतर आता धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?  

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या संदर्भात त्यांना विचारलं असता या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, मी काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही. ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं, तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही. ज्या तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या,  ट्रायल कोर्टात होऊन द्या, तपास यंत्रणा काम करत आहेत, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed