• Mon. Apr 28th, 2025

सर्वधर्म समभावाचा विचार आणि विकासाचा वारसा जोपासणाऱ्या निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा -माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर 

Byjantaadmin

Nov 16, 2024

     – माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर 

    निलंगा/प्रतिनिधी: जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व अशी माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे.त्यामुळे २० तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी,असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी केले.निलंगा येथे आयोजित वीरशैव समाजाच्या मेळाव्यात बसवराज पाटील बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी शिवाजीराव रेशमे तर मंचावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे,माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी,बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की,लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची राज्यात व देशात वेगळी ओळख आहे.अनेक इतिहास जिल्ह्याने घडवले आहेत.एक केंद्रीय गृहमंत्री व दोन मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याने दिले.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांनी  सर्वधर्मसमभावाचे विचार दिले. विकासकामेही केली.हाच वारसा माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे जोपासत आहेत.त्यामुळे समाजाने त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही बसवराज पाटील म्हणाले.त्यांनी सांगितले की,राजकीय दृष्ट्या विचार करता सध्याची परिस्थिती बिकट आहे.

स्वार्थापायी सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारा नेता अशी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. असे नेतृत्व जोपासणे,त्याला बळ देणे ही आपली बांधिलकी आहे. त्यामुळे आ.संभाजीराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे ते म्हणाले.बसवराज पाटील म्हणाले की, आ.संभाजीराव पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. प्रत्येक उंबरठ्याचा विकास ही त्यांची संकल्पना अनोखी आहे. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचे वेगळे परिमाण स्थापित केले आहेत.या सर्व बाबींचा विचार करता निलंगा मतदारसंघासाठी आ.संभाजीराव पाटील यांचे नेतृत्व ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भविष्यात त्यांना मोठी संधी मिळणार असून त्यामुळे निलंगा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे बसवराज पाटील म्हणाले.

       यावेळी बोलताना आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की,राजकीय इतिहास घडवण्याची संधी निलंगा मतदारसंघातील जनतेला चालून  झाली आहे.निलंगा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात मी काम केले.प्रत्येक जाती-धर्म आणि समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला.लिंगायत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने पाठपुरावा करू. निलंगा मतदारसंघात कर्नाटक राज्यात असणाऱ्या पुतळ्याहून आकर्षक असा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करू.लिंगायत समाज दूरदृष्टीचा विचार करतो. त्यांचे विचार वास्तववादी असतात.या समाजाने आज पर्यंत अनेक परिवर्तने घडवली आहेत.आता समाज बांधवांनी निलंगा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात महायुतीच्या पाठीशी आपले पाठबळ उभे करून राजकीय परिवर्तन घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.

     अध्यक्षीय समारोपात रेशमे म्हणाले की,मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही परंतु सर्वपक्षियांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मतदारसंघात एकोपा टिकवून ठेवला आहे. लिंगायत समाजाला राजकारणातही संधी दिली आहे. विकासाला प्राधान्य देताना सामाजिक एकोपा कायम राखला असून ही परंपरा अशीच ठेवण्यासाठी समाजाने आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभे रहावे,असे आवाहनही त्यांनी केले.विनोद आर्य,शिवकुमार चिंचनसुरे, डॉ.मल्लिकार्जुन शंकद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.या मेळाव्यास माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, सोमनाथ धर्मशेट्टी, एम.के.कस्तुरे, माजी नगरसेवक शंकरप्पा भुरके, बस्वराज राजूरे, रत्नेश्वर गताटे, राजकुमार निला, महेश शेटकार, शिवप्पा भुरके, मल्लिकार्जुन कोळ्ळे, सर्यकांत पत्रे,बाबुराव महाजन, नागनाथ स्वामी, संजय कुभार, दत्ता मोहळकर, बसु तेली, रामेश्वर तेली, प्रकाश पटणे, युवराज बिराजदार, बुध्दीवंत मुळे, सिध्दुप्पा सोरडे आदी सह मतदारसंघातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 संभाजीरावांच्या नेतृत्वात ६  मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार –  बसवराज पाटील 

      आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील २०  वर्षात पारदर्शक व प्रभावी नेतृत्व केले आहे.त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असून त्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदही देण्यात आले होते.आताही आ. निलंगेकर यांना मोठी संधी असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व सहाही मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केला.

मामा खंबीरपणे पाठीशी…

    माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की आ.संभाजीराव पाटील यांच्यावर निलंगेकर परिवाराचे संस्कार आहेत परंतु आई म्हणून रूपाताई पाटील यांनीही त्यांच्यावर संस्कार केले. या माध्यमातून चालुक्य घराणे आणि उमरगा तालुक्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत.चालुक्य परिवार आणि उमरगा तालुक्याचे नाते पाहता मी संभाजीरावांचा मामा आहे.मामाच्या नात्याने मी खंबीरपणे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभा असल्याचेही बसवराज पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed