महायुतीनेच समाजहिताच्या कल्याणकारी योजना राबवल्या -आ.विक्रम काळे
लातूर/प्रतिनिधी:राज्यातील महायुती सरकारने समाजाती विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या.यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकारच स्थापन होणार असून त्यासाठी लातूर शहर मतदारसंघातून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करण्याचे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. कस्तुराई मंगल कार्यालयात आयोजित शिक्षक संवाद बैठकीत आ.काळे बोलत होते.या बैठकीस उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह एस.एस.पाटील,शिवकुमार बिरादार,राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ.विक्रम काळे म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याची योजना सुरू केली.नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना भरपाई दिली.पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी १२ हजार रुपयांची मदत केल्याचेही आ.काळे म्हणाले.
शिक्षकांसाठी या सरकारने सुधारित शिक्षक पेन्शन योजना लागू केली.त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना लाभ झाला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणारच आहे.सरकार यावे यासाठी लातूर शहर मतदार संघातून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करा. आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभे रहा.स्टार प्रचारक म्हणून त्यांना विजयी करण्यासाठी काम करा,असे आवाहनही आ.काळे यांनी केले.
यावेळी बोलताना उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण अग्रेसर राहू असे सांगितले.शिक्षक नवी पिढी घडवतात.त्या शिक्षकांना कसल्याही अडचणी राहू नयेत याची दक्षता आपण घेऊ,असेही त्या म्हणाल्या. या संवाद बैठकीस विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
