• Tue. Apr 29th, 2025

“इम्तियाज जलील भाजपची बी टीम, पैसे खातात”, MIM नेत्याने गंभीर आरोप करत सोडला पक्ष

Byjantaadmin

Oct 23, 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षात मोठी फूट पडली आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इम्तियाज जलील हे भाजपची बी टीम असून, ते भाजप, शिवसेनेकडून पैसे खातात, असा आरोप कादरी यांनी केला आहे. तसेच जलील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नांदेड नवे नागपूरमधून निवडणूक लढवून दाखवावी. जर ते माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर त्यासाठी मी देखील तयार आहे, असं आव्हान गफ्फार कादरी यांनी दिलं आहे.गफ्फर कादरी यांनी म्हटलं की, आज मी एमआयएम पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझा राजीनामा ओवेसी यांच्या मेलवर पाठवला आहे. 10 वर्षानंतर मी MIM शी माझं नातं तोडलं आहे. 10 वर्ष मी पक्षाचे काम केले. ओवेसी यांनी मला उमेदवारी देण्याच आश्वासन दिले होते. छत्रपती संभाजीनगरला आल्यावर ओवेसी यांनी 4 उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे मला पक्ष उमेदवारी देणार नाही, असं माझ्या मनात आले. त्यांनंतर मी हैदराबादला जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

10 वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला ओवेसी पाच मिनिट वेळ देऊ शकले नाही. सुरुवातीपासून जलील यांनी माझं राजकीय नुकसान करण्यासाठी प्रयत्न केले. मी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहे. माझ्या राजीनाम्यानंतर अनेक राजीनामे पडणार आहेत. इम्तियाज जलील हे फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा आरोपही कादरी यांनी केला.ज्या मतदारसंघातून मी लढतो, तिथे फडणवीस यांचे लाडके अतुल सावे निवडणूक लढवतात. वंचितसोबतची युती जलील यांच्यामुळे तुटली. सावे यांच्या मदतीसाठी MIM कमजोर उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहे. वंचितसोबत पहिली बैठक ओवेसी यांच्या घरी झाली. जलील निवडून आल्यावर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहले. पहिल्याच पत्रात आम्हाला 125 जागा पाहिजे अशी मागणी केली. निवडून येईपर्यंत जलील त्यांचं कौतुक करत होते, निवडून आल्यावर भूमिका बदलली, असंही गफ्फार कादरी यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed