• Tue. Apr 29th, 2025

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज; उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रणासाठी पथके गठीत-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Oct 23, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज; उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रणासाठी पथके गठीतजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर, : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संबधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्यासह पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 पासून सुरु होईल. तसेच उमेदवारी माघे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 पर्यंत असून निवडणूक चिन्ह वाटपाची कार्यवाही 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 नंतर सुरु होईल. तसेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. सर्वसाधारण तथा अराखीव संवर्गातील उमेदवारांना 10 हजार रुपये आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांना 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपयेपर्यंत निवडणूक खर्चाची मर्यादा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर भरारी पथके, चेकपोस्ट, व्हिडीओ सर्व्हीलंस टीम आदी विविध पथके गठीत करण्यात आली आहेत. यामाध्यमातून प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक बाबीवर लक्ष राहणार असून या काळात मतदारांना आमिष दाखविणे, धमकाविणे आदी कोणतेही गैरप्रकार होवू नयेत, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काळात आदर्शआचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभारल्या आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत आदर्श आचारसंहिता भंग, सोशल मिडियावर फेक न्यूज, द्वेषपूर्ण मजकूर प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच मद्य, गुटखा आदी पदार्थ्यांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कार्यं राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जमा करून घेण्याची कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्होटर सर्व्हिस पोर्टल आणि व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप

मा. भारत निवडणूक आयोगाने सुरु केलेल्या https://voters.eci.gov.in/ या पोर्टलद्वारे मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणे, मतदान ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी किंवा मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज, मतदान केंद्र शोधणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहत. व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅपद्वारे मतदारांना वरील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे ठिकाण

234- लातूर ग्रामीण- पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर

235- लातूर शहर- कोर्ट हॉल, पहिला मजला, तहसील कार्यलय, मेन रोड, लातूर

236- अहमदपूर-  तहसीलदार यांचा कक्ष, तहसील कार्यालय, अहमदपूर

237- उदगीर (अ.जा.)- तहसीलदार, उदगीर यांचे दालन, महसूल भवन, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर

238- निलंगा- तहसीलदार, निलंगा यांचे दालना शेजारी कोर्ट हॉल, तहसील कार्यालय, निलंगा

239- औसा- निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, औसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed