विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
· नोडल अधिकारी, शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक
· ४८ तास, ७२ तासात करावयाच्या कार्यवाहीचे अहवाल सादर करावेत
· प्रत्येकाने निवडणूकविषयक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी
लातूर, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. विशेषतः सर्व शासकीय विभागांनी आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये, याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २४ तासात, ४८ तासात आणि ७२ तासात आवश्यक कार्यवाही करून त्याबाबतचे अहवाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या सर्व नोडल अधिकारी, शासकीय विभाग प्रमुख आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र नागणे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून २४ तासात, ४८ तासात व ७२ तासात करावयाच्या कार्यवाहीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्व शासकीय विभागांनी काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही कार्यालयामध्ये, शासकीय मालमत्तेवर राजकीय व्यक्तीचे व मतदारावर प्रभाव टाकणारे पोस्टर, फलक, छायाचित्रे राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आचारसंहिता काळात नवीन कामांना तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश देण्यात येवू नयेत. कार्यारंभ आदेश देवूनही अद्याप सुरु न झालेली कामे, तसेच सध्या सुरु असलेल्या कामांची यादी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांच्या नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना पथकाच्या कामाबद्दल प्रशिक्षण देवून अचूकपणे कामकाज पार पडेल, याची दक्षता घ्यावी. एक खिडकी योजनेतून विविध परवानग्या देण्याची कार्यवाही गतीने करावी. तसेच भरारी पथकांनी निवडणूक काळात प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आदर्श आचारसंहितेचे पालन होत असल्याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
स्थिर निगराणी पथके आणि भरारी पथकांनी सतर्क राहून निवडणूक काळात पैशांचे वाटप, मौल्यवान भेटवस्तूंचे वाटप होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रचार सभेतील खर्चाचे योग्यप्रकारे संनियंत्रण करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासोबतच आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमेवर चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी आदर्श आचारसंहिता काळात विविध शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र नागणे यांनी निवडणूक खर्च संनियंत्रणबाबत माहिती दिली.
