• Tue. Apr 29th, 2025

सभासद सहकारी संस्थांना मोबाईलचे वाटप सुरू,; सहकारी संस्थांची सक्षमीकरणाकडे वाटचाल, मोबाईलमुळे संस्थांचे कामकाज गतीमान

लातूर / प्रतिनिधी

दिवसेंदिवस बँक व्यवहारात मोबाईल व डिजिटल सेवांचा वापर वाढत आहे. यामुळे विविध क्षेत्रात राज्यात आघाडीवर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध ऑनलाईन बँकींग व डिजीटल बँकींगमध्ये पुढचे पाऊल टाकले आहे. बँकेचे सभासद असलेल्या सहकारी संस्थांनाही या सेवांमध्ये सहभाग वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने संस्थांना मोबाईल भेट देण्याचा निर्णय घेतला. वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या या निर्णयाची महिन्याच्या आत वचनपूर्ती केली असून संस्थांना दसऱ्याच्या महुर्तावर मोबाईल वाटप सुरू केले आहे. यामुळे सहकारी संस्थांची सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झाली असून संस्थांचे कामकाज मोबाईलमुळे गतीमान होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्थांना मोबाईलचे वाटप करण्यात येत आहे. दसऱ्यानिमित्त लातूर, रेणापूर, उदगीर व देवणी तालुक्यांतील संस्थांना शनिवारी (दि. १२) मोबाईल वाटप केल्यानंतर सोमवारी (दि. १४) औसा, चाकुर, शिरुर अनंतपाळ व अहमदपूर  तालुक्यांतील संस्थांना मोबाईल वाटप केलेले आहेत. उर्वरित सर्वच सभासद सहकारी संस्थांना लवकरच मोबाईलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली. मोबाईलमुळे संस्थांचा संपर्क वाढणार असून संस्थांचे विविध कामकाज मोबाईलवरूनही होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीने जिल्हा बँकेने ग्राहक व सभासदांसाठी मोबाईल अॅप, डिजीटल व मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींग आदी सेवा व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. काही दिवसापूर्वीच बँकेने युपीआय पेमेंटची सुविधा देत डिजीटल बँकींगमध्ये पुढचे पाऊल टाकले. यामुळे ग्राहक व सभासदांना बँकेत न येता खात्यावरील सर्व व्यवहार करता येत आहेत. या व्यवहारात सभासद संस्थांचा सहभाग वाढवा व या व्यवहारांसाठी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बँकेचे मार्गदर्शक माजीमंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमख यांच्या सुचनेनुसार बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सर्व सभासद संस्थांना अँड्राईड मोबाईल भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बँकेच्या १२ सप्टेंबर रोजी झालेल्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजीमंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या सर्व प्रकारच्या सभासद संस्थांना अँड्रॉईड मोबाईल भेट देण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयाची बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने तातडीने निविदा काढून महिन्याच्या आत वचनपूर्ती केली असून मोबाईलचे प्रत्यक्षात वाटप सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांशी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना मोबाईलचे वाटप करण्यात येत असून विजयादशमीपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित सर्व सभासद संस्थांनाही लवकरच मोबाईलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली.

संस्थांचे कामकाज गतीमान होणार

जिल्हा बँकेने भेट दिलेल्या मोबाईलमुळे बँकेच्या ग्राहकांप्रमाणेच बँकेचे सर्व ऑनलाईन व बँकींग सेवा व सुविधांचा उपयोग संस्थांनाही करता येणार आहे. संस्थेची संबंधित माहितीची देवाणघेवाण व पत्रव्यवहार मोबाईलवरून करता येणार आहे. संस्थांसोबत तातडीने संपर्क होणार आहे. संस्थेच्या खात्यावरील व्यवहाराचा तपशील तातडीने उपलब्ध होण्यासोबत खात्यावरील बँक व्यवहाराचे मेसेजही मोबाईलवर येणार आहेत. यामुळे संस्थेच्या कामकाजात गतीमानता येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed