• Mon. Apr 28th, 2025

दंगल उसळवण्याचा कट भाजपला भोवणार; फौजदारी रिट याचिकेची हायकोर्टाकडून गंभीर दखल

Byjantaadmin

Apr 3, 2024

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याचे भाजपचे षड्यंत्र असून धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ विधाने करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन, तेलंगणातील टी. राजा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर ८ एप्रिलला तातडीने सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी भडकाऊ विधाने करत धार्मिक वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. याचा लोकसभा निवडणूक काळात विपरीत परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने संबंधित आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका खार येथील शिक्षिका अफताब सिद्धिकी व अन्य रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

  • याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. विजय हिरेमठ यांनी सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर याचिका निदर्शनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने ८ एप्रिलला सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.
  • धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ भाषणे वा विधाने केली जात असतील, त्यावेळी नागरिकांकडून तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबर २०२२ आणि १३ जानेवारी २०२३ रोजी दिले होते. मात्र मीरा-भाईंदर व मुंबई पोलिसांनी भाजप आमदारांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे नितेश राणे, गीता जैन आणि टी. राजा यांच्या भडकाऊ विधानांनी उल्लंघन केले आहे, असा दावा याचिकेत केला आहे.
  • लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही भडकाऊ विधाने करून मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. हा दंगल भडकावण्याचाच कट असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed