आदर्श आचारसंहिता विषयक पथकांनी समन्वयाने काम करावे– मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर
· भरारी पथके, स्थायी पथकांच्या कार्यवाहीचा आढावा
लातूर, : जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी भरारी पथक, स्थायी पथक आणि व्हिडीओ सर्व्हीलंस पथकासह इतर सर्व संबंधित पथकांनी समन्वयाने काम करावे. आदर्श आचारसंहिताविषयक तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित पथकांच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयक विविध पथकांचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय प्रमुख यांच्या बैठकीत श्री. सागर बोलत होते. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी बाबासाहेब मनोहरे, निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, सीविजील कक्षाचे नोडल अधिकारी बालाजी मरे यावेळी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व गट विकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी भरारी पथके, स्थायी पथके आणि व्हिडीओ सर्व्हीलंस टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व पथकांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविक्री किंवा वाहतूक, रोकड, अंमलीपदार्थ वाहतूक होत असल्यास भरारी पथके, स्थायी पथके, तसेच संबंधित विभागांनी गठीत केल्या पथकांनी त्वरित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा. प्रत्येक कारवाईची पंचनामा, व्हिडीओ शुटींग करणे आवश्यक असल्याचे श्री. सागर म्हणाले.आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास त्याबाबत तातडीने नियमानुसार कार्यवाही करावी, असे महानगरपालिका आयुक्त श्री. मनोहरे यांनी सांगितले.निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पथकांनी आपला अहवाल विहित नमुन्यात जिल्हास्तरीय कक्षाकडे सादर करावा. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने निश्चित केलेल्या दराने प्रत्येक बाबीसाठी आलेला खर्च त्यामध्ये नमूद करावा, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. चाटे यांनी सांगितले. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी आदर्श आचारसंहिता कक्षामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.