मुंबई : नवे वाहन खरेदी करायचे आहे, पण जुन्या वाहनांना चांगला भाव मिळत नसल्याने चिंतेत असणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात दोन वाहन निष्कासन केंद्रे (स्क्रॅपिंग सेंटर) सुरू झाली असून, वाहन भंगारात काढण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. आयुर्मान पूर्ण झालेले भंगार वाहन केंद्रावर जमा केल्यास नव्या वाहनखरेदीत १० टक्के सवलत मिळणार आहे. जुन्या वाहनांना बाजारभावापेक्षा अधिक दर केंद्राकडून वाहनचालकांना मिळणार आहे.

जुन्या वाहनांतून कार्बन उत्सर्जन अधिक होते. यामुळे नव्या वाहनांच्या तुलनेत ही वाहने प्रदूषणास अधिक कारणीभूत ठरतात. प्रदूषणकारी वाहने हद्दपार करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन निष्कासन धोरण जाहीर करण्यात आले होते. राज्यात वाहन निष्कासन केंद्र उभारण्यासाठी एकूण २५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. जालना आणि नागपूर या ठिकाणी दोन केंद्रे सुरू करण्यात आली. पुणे (३), नागपूर (३) रायगड (२) आणि नाशिक (१) या ठिकाणी केंद्र उभारणीचे कार्यादेश देण्यात आले आहेत, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.आयुर्मान पूर्ण झालेले जुने वाहन अधिकृत केंद्राकडे निष्कासनासाठी दिल्यानंतर वाहनचालकांना सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीओडी) देण्यात येते. नवे वाहन खरेदी करताना या सीओडीच्या आधारे वाहनकरात १० टक्के सवलत मिळणार आहे. बाजारभावापेक्षा अधिक भाव केंद्राकडून वाहनधारकांना मिळतो.जुनी वाहने विकल्यानंतर देशविघातक कृत्यासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा वाहन भंगारात दिल्यानंतरही वाहनचालकांना ई-चलानचा संदेश मोबाइलमध्ये येतो. अधिकृत केंद्रात वाहन दिल्यास अशा सर्व तक्रारींचा त्रास टाळणे शक्य आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.केंद्राच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या मंजुरीने देशात ९८ वाहन निष्कासन केंद्रे कार्यान्वित आहेत. या केंद्रांत २२,४३० वाहने निष्कासन करण्यासाठी अर्ज आले आहेत. यात संरक्षण विभागाच्या ११,५४६ वाहनांचा समावेश आहे. vscrap.parivahan.gov.in या वेबसाइटवर वाहन निष्कासन नोंदणी करता येईल. जुन्या वाहनांचा वाहन क्रमांक नव्या वाहनाला कायम ठेवण्याची सुविधा वेबसाइटवर उपलब्ध आहे. केंद्रातील बहुतांश कामे यांत्रिक पद्धतीने करण्यात येतात. यामुळे वाहनांचे टायर, काच, प्लास्टिक, इंजिन आणि अन्य भागांचे वर्गीकरण होत असल्याने त्याचा पुनर्वापर आणि शास्त्रीयदृष्ट्या नष्ट करणेही शक्य होत आहे.